Jalna: दु:खद बातमी! मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Jalna : या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असतानाच अंतरवाली सराटीत आलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.

Jalna: राज्यात नोंदी निघत असलेल्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देणे, त्यांच्या व्हॅलिडिटी देणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यासंह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असतानाच अंतरवाली सराटीत आलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दशरथ रायकर असे मृत आंदोलकाचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याचे समजते. दशरथ रायकर हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते अंतरवाली येथील एका शेतात झोपले होते. मात्र, सकाळी ते झोपेतून उठत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Jalna)
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सलग दोन दिवस धाराशिवमध्ये आक्रमक होत मराठा समाजाने आंदोलन केले आहे, सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही, तर येत्या काळात अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बंदला मराठा समाजाकडून व्यापारी संघटनांही पाठिंबा दिला आहे. (Jalna)
सकल मराठा समाजाच्यावतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले असून, हा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांना ही सुट्टी देण्यात आली आहे.





