Top 10 News : मनोज जरांगे उपोषणावर ठाम, पुण्यात यूट्यूबर संतोष पंडित अटकेत आणि कंगना राणावत अन् स्वरा भास्करचा वाद रंगला , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सरकारची बाजू मांडली.

मनोज जरांगे उपोषणावर ठाम;
सरकारला चार दिवसांची मुदत
Top 10 News : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सरकारची बाजू मांडली. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचा दावा लाड यांनी केला. जातपडताळणी समितीकडून रद्द झालेली चार प्रमाणपत्रे आणि संबंधित प्रकरणांबाबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य सरकारी वकिलांना निर्देश देऊन सर्व प्रकरणे मागे घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, जरांगे यांनी उपोषण सोडण्यास नकार देत सरकारला चार दिवसांची मुदत दिली. लाड यांच्या विनंतीवरून त्यांनी सलाईन घेतले. सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस,
११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत रिमझिम सुरू आहे. मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. जळगाव, संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेची ठेकेदाराला धमकी
सर्वसाधारण सभेत धमकी दिल्याने खळबळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी ठेकेदाराला टोकाची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करण्याची मागणी करत, सुधारणा न झाल्यास “त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार,” असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भाषेवर आणि कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुण्यात यूट्यूबर संतोष पंडित अटकेत;
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप
पुण्यातील यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी आज पहाटे अटक केली. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सारिका कांबळे यांच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोथरूडमधील विकासकामांवर प्रश्न उपस्थित करताना अश्लील शेरेबाजी केल्याचाही आरोप पंडित यांच्यावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बीडकरांचे पुणे रेल्वेचे स्वप्न साकार;
१७ सप्टेंबरपासून थेट रेल्वेसेवा Top 10 News :
बीडच्या विकासाला नवी गती देणारी महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू होणार असून, यासाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी रेल्वेसेवेच्या उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बीड-पुणे रेल्वेमुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी होणार असून, कृषी, उद्योग, शिक्षण आणि व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, डिसेंबरअखेर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वेसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अभिनंदन वर्धमान यांचा नवा अध्याय;
आता FLY91 मध्ये कमर्शियल पायलट!
२०१९ मध्ये पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि ‘वीर चक्र’ विजेते अभिनंदन वर्धमान आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गोव्यातील खासगी विमान कंपनी FLY91 मध्ये कमर्शियल पायलट म्हणून प्रवेश केल्याचे समोर आले आहे. ऑगस्टमध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर सध्या ते आवश्यक प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आहे. २०१९च्या हवाई संघर्षातील शौर्याबद्दल त्यांना २०२१ मध्ये ‘वीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. दरम्यान, FLY91 ने मार्च २०२४मध्ये व्यावसायिक विमानसेवा सुरू केली असून, कंपनीकडे सध्या सहा ATR 72-600 विमाने आहेत.
“भारताने योग्य वेळी मदत केली”
बालेन शाह यांनी मानले भारताचे आभार
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे १,१२७ जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. या आपत्तीनंतर भारत आणि चीनने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान बालेन शाह यांनी दोन्ही देशांचे आभार मानले. भारत आणि चीनने तंत्रज्ञ पाठवून हवाई टेहळणी केली तसेच नुकसानीचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भागात चिखल आणि गाळामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरल्याचेही शाह यांनी नमूद केले. भारताने बोगदा बचाव पथक, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक पाठवले असून डीएनए तपासणीद्वारे मृतांची ओळख पटवली जात आहे. तसेच ब्लँकेट, औषधे, प्रथमोपचार किट आणि सोलार लॅम्पचा पुरवठाही करण्यात आला आहे.
पृथ्वीच्या विनाशाची उलटी गिनती?
एलॉन मस्कचा मोठा दावा
जगभरातील महापूर, भूकंप आणि वाढते वणवे यामुळे हवामान बदलाचा धोका गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या भवितव्याबाबत इशारा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे मानवजातीसमोर मोठे संकट उभे राहू शकते. पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पुढील ५० वर्षे अत्यंत महत्त्वाची असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. केवळ सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढवणे पुरेसे नसून, अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे त्यांचे मत आहे. उपग्रहांच्या माध्यमातून सूर्यकिरणांचा प्रभाव नियंत्रित करण्यासह स्पेस जिओइंजिनिअरिंगचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मात्र, या संकल्पना अद्याप संशोधनाच्या टप्प्यावर असून, त्याबाबत वैज्ञानिक पुरावे आणि संभाव्य धोके तपासणे आवश्यक आहे
भारताकडे महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद;
मुंबई-वडोदरात रंगणार पहिली स्पर्धा!
आयसीसीने पहिल्यावहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताला दिले आहे. ही स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे होणार आहे. स्पर्धेतील सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे सहा संघ स्पर्धेत सहभागी होतील. सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार असून, राउंड-रॉबिन पद्धतीत प्रत्येक संघ इतर पाच संघांशी भिडेल. गुणतालिकेतील अव्वल दोन संघ २८ फेब्रुवारीला अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. पाकिस्तानला स्पर्धेत स्थान मिळालेले नाही.
कंगना राणावत विरुद्ध स्वरा भास्कर;
‘पद्मावत’च्या जौहर दृश्यावरून वाद Top 10 News :
‘पद्मावत’ चित्रपटातील जौहर दृश्यावर अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या वक्तव्यामुळे कंगना राणावत आणि स्वरा आमनेसामने आल्या आहेत. हे दृश्य अस्वस्थ करणारे असून, महिलांनी सन्मानासाठी मृत्यूला कवटाळणे योग्य आहे का, असा सवाल स्वराने केला होता. यावर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘पद्मावत’ची एआय आवृत्ती असलेला व्हिडिओ शेअर केला. रॅपच्या माध्यमातून राणी पद्मावतीला भित्रे म्हणणाऱ्यांवर टीका करण्यात आली. दरम्यान, आपण राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या महिलांना भित्रे म्हटले नसल्याचे स्वराने स्पष्ट केले. तिच्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचा दावा तिने केला असून, पतीनेही तिची बाजू घेतली.





