Pandharpur News : पंढरपूरात दुर्देवी घटना! चंद्रभागेत तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू

Pandharpur News : पंढरपूरमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आज शनिवार सकाळी चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून, एका महिला भाविकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पंढरपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक आज सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत बुडल्या. यावेळी नदीपात्रात स्नानास उतरलेल्या इतर महिला भाविक यांनी आरडा ओरडा करून मदतीसाठी याचना केली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिन्ही महिला पाण्यात बुडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या आणि आणखी एक महिला अशी मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला भोकरदन तालुक्यातील असल्याचे समजते. तर बूडून गेलेल्या चौथ्या महिलेचा शोध सुरू आहे. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजना करणे आवश्यक होते, असे या घटनेनंतर बोलले जात आहे.





