Talegaon: तळेगावात लक्ष्मीपूजन उत्साहात; विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहर उजळले
विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहर उजळले

तळेगाव दाभाडे – दिपोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील दुकानांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दिव्यांचा लखलखाट, फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने शहरात सर्वत्र दीपोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या दिवशी धन, ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीची देवता असलेल्या लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. घरातील तसेच व्यवसायातील भरभराट कायम राहावी, कुटुंबात सुख-शांती नांदावी आणि वर्षभर आर्थिक स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. त्यामुळे नागरिकांकडून लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यात आली होती.
लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत वर्दळ सुरू झाली होती. लक्ष्मीमातेचे फोटो आणि मूर्ती, फुले, हार, आंब्याची पाने, झेंडूची फुले, रांगोळी, पणत्या, धूप, अगरबत्ती, मिठाई, फराळाचे साहित्य तसेच पूजेचे अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती.
लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील घरे, दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. घरांच्या प्रवेशद्वारांवर फुलांची तोरणे लावण्यात आली होती. अंगणात आणि दारासमोर विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी पारंपरिक रांगोळ्यांसह लक्ष्मीची पावले आणि शुभचिन्हे रेखाटण्यात आली होती.
दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही विशेष सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांचे हार आणि दिव्यांनी बाजारपेठेतील वातावरण प्रसन्न झाले होते. अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता करून पूजेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दिव्यांचा लखलखाट, फुलांची सजावट, आकर्षक रांगोळ्या, लक्ष्मीपूजन आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे शहराने दीपोत्सवाचे सुंदर रूप धारण केले होते.
पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या लक्ष्मीपूजनामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सुख, समृद्धी आणि भरभराटीची कामना करीत तळेगावकरांनी लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा केला.
फटाक्यांच्या आतषबाजीने शहर उजळले
लक्ष्मीपूजनानंतर लहान मुलांसह नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत दीपावलीचा आनंद साजरा केला. सायंकाळपासूनच शहरातील विविध भागांत फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते. आकाशात उंच झेपावणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांनी परिसर उजळून निघाला होता.
फुलबाज्या, अनार आणि विविध प्रकारच्या फटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन दिवाळीचा आनंद घेत होते. एकमेकांना शुभेच्छा देणे, फराळाचे पदार्थ वाटणे आणि दिव्यांच्या प्रकाशात सण साजरा करणे, अशा उत्सवी वातावरणाने शहरातील घरे आणि परिसर आनंदाने भारावून गेला होता.
‘स्वच्छ, सुंदर आणि हरित तळेगाव ही संकल्पना राबवत असताना हा दिवाळीचा सण उत्साहाने नागरिक साजरा करत आहे. शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. दीपावलीच्या आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.’ – संतोष दाभाडे पाटील, नगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद.
Pimpri-Chinchwad : शहरातील रस्ते झाले सुनसान! हजारो नागरिक दिवाळीसाठी गेले गावी





