Accident News : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू
Accident News : गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील चामोर्शी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला आहे

Accident News : आष्टी येथील चामोर्शी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. एचपी पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे अनकोडा गावावर शोककळा पसरली आहे. (Accident News)
बापलेक दुचाकीवरून आष्टीकडे येत होते
या अपघातात राजू येलमुले आणि श्याम विश्वास यांचा मृत्यू झाला. राजू येलमुले आणि त्यांचा मुलगा संदीप राजू येलमुले हे अनकोडा येथून आष्टीकडे येत होते. त्याचवेळी श्याम विश्वास हे आष्टीहून आपल्या गावी जात होते. दरम्यान, दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील प्रवासी दूरवर फेकले गेले. (Accident News)
या अपघातात संदीप येलमुले गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वडिलांचा मृत्यू मुलाच्या डोळ्यांसमोर झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेनंतर चामोर्शी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Accident News)
अमरावतीत एसटी बस उलटली; १० प्रवासी जखमी
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धोत्रा ते सालोरा मार्गावर एसटी बस उलटल्याची दुसरी घटना घडली. शिरसगाव मोझरी येथून अमरावती शहराकडे येणारी बस रस्त्यावर उलटली. खराब रस्त्यामुळे बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती देण्यात आली आहे. (Accident News)
बसध्ये २० ते २५ प्रवासी होते. या अपघातात १० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident News)




