उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी; धनकवडीत दुतर्फा वाहने उभी केल्याने रस्ता अरुंद

धनकवडी – श्री सद्गुरू शंकर महाराज मठ चौक ते कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय चौकापर्यंत स्वारगेट-सातारा रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात असल्याने रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याने बालाजी नगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संभाजीनगर, चैतन्य नगर, भागात जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्वारगेट-सातारा रस्त्यावरून बालाजी नगरकडे जाणाऱ्या धनकवडे पेट्रोल पंपाजवळील चौकात वाहतूक नियंत्रण प्रशासनामार्फत सिग्नल लावण्यात आला आहे. मात्र या सिग्नलचा वेळ बहुता जास्त असल्यामुळे व वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे अशी तक्रार नगरिकांमार्फत केली जात आहे.
महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने उड्डाणपूल उभारला असला तरी या पुलाखालील वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक त्रस्त आहे. बीआरटी मार्गात देखील अनधिकृतपणे अनेक वाहने उभी केली जात आहेत. यामध्ये अनधिकृत रिक्षास्टॅन्डची भर पडत आहे. अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सही मिळेल त्या ठिकाणी पार्क केल्या जात आहेत. याशिवाय छोटे-मोठे टेम्पोही या ठिकाणी भाडे मिळवण्याच्या प्रयत्नात कोठेही उभे केलेले असतात यामुळे स्वारगेट-सातारा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरासह धनकवडी रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे.
कारवाई का नाही?
धनकवडी परिसरात मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात जिकडे पाहू तिकडे अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात, अशा स्थिती वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना कारवाई होत नाही. ही कारवाई का होत नाही? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.
अहिल्यादेवी चौक ते धनकवडीकडे जाणाऱ्या येथील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. स्वारगेट-सातारा रस्त्याच्या दुतर्फा डबल पार्किंगची मोठी समस्या असून याबाबत वाहतूक पोलिसांना निवेदन देऊनही कारवाई करण्यास विलंब होत आहे, असे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे म्हणाले.





