पुणे जिल्हा | उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी नित्याचीच

उरुळी कांचन, {हनुमंत चिकणे} – पुणे-सोलापूर महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत. त्यात लग्नसराईमुळे मोठी गर्दी होत आहे. उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकातील हातगाडीवर फळे विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे फळे घेणारे मोठ्या प्रमाणात थांबतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. वास्तविक, याकडे पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) लक्ष देण्याची गरज आहे.
सततची वाहतूक कोंडी उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, निवडणुकांचे करायचे काय असा सवाल नागरिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांचा आहे. वाहनांच्या रांगा अगदी दोन, तीन किलोमीटरवर लागत आहे.
उरुळी कांचन गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तळवाडी चौकातून जेजुरीकडे जाण्यासाठी अगदी एक ते दीड तास लागतो. कामगार, शेतकरी, नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक आदींचे हाल होत आहेत. पोलिस व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
उरुळी कांचन पोलीस, ग्रामपंचायत व एनएचएआय (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) यांनी योग्य ते नियोजन करत वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वाढतीये वाहनांची संख्या
उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक नियोजनातील समस्या मात्र कायम आहे. वाहतूक कोंडीत यामुळे भरत पडत आहे. प्रयागधाम व कोरेगाव मूळकडे जाणार्या चौकात, तसेच एलाईट चौक, तळवाडी चौक, मुख्य बाजारपेठ येथील वाहतूक कोंडी सुटता सुटेना अशी परिस्थिती आहे. तसेच हा परिसर वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो.
उरुळी कांचन येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. जाताना व येताना या ठिकाणी वाहतूक पोलीस काम करतात. मात्र, त्याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणावर यवतच्या बाजूला जाणार्या व पुण्याकडे जाणार्या रस्त्यावरच दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने थांबलेली असतात. वाहतूक शाखेचे पोलीस मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. -जीवन आतकिरे, व्यावसायिक, बोरीभडक, ता. दौंड
उरुळी कांचन येथील चौकात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना कायमच सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चौकात तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पोलिसांच्या नेमणुका केल्या आहेत.
दोन दिवसांत स्वतः जाऊन वाहतूक कोंडीचा आढावा घेणार आहे. वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल यासाठी उपाययोजना करणार आहे. तसेच नागरिकांना दैनंदिन होणार्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. -पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण
वाहतूक कोंडीची कारणे
-पोलिसांच्या नियोजनाचा अभाव
-अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
-खासगी वाहनधारक, ट्रॅव्हल्स, रिक्षा चालकांनी रोडचा घेतलेला ताबा
-बेशिस्त वाहन चालक
-बेशिस्त वाहन पार्किंग
-अधिकृत पार्किंगचा अभाव
-विरुद्ध दिशेने प्रवास





