Pune: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पुणेकरांना धरले वेठीस; बॅरिकेड्समुळे पुणेकर हैराण, मंत्र्यांचाही ताफा अडवला

पुणे – गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अप्पा बळवंत चौकासह मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडस् लावून पोलिसांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले. गणेशोत्सवापूर्वी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पहिले पाच-सात दिवस रस्ते बंद होणार नाहीत, दुचाकी व रिक्षा चालकांना मार्ग खुले राहतील, अशी घोषणा केली होती. घोषणा एका अंमलबजावणी भलतीच असे चित्र निर्माण झाले आहे. यातच पोलिसांनी महापालिकेसोबत रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदा पथारीवाल्यांवर कारवाई केली.
यामुळे पथारीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेत गाडगीळ पुतळा येथे रस्ता अडवला. यामध्ये सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची खासगी गाडी अडकली. पथारीवाल्यांनी त्यांना मध्यस्थी करण्याची विनंती करत गाडी अडवून धरली. मात्र भोसले यांनी मला काही माहित नसल्याचे सांगत तेथून काढता पाय घेतला. यानंतर ते दुसऱ्या मार्गाने गणेश दर्शनाला गेले.
भर दुपारीच रस्ते बंद केल्याने दुचाकी, चारचाकी चालकांची तारांबळ उडाली. रहिवासी, बाजारपेठेत जाणारे खरेदीदार आणि भाविक अशा सगळ्यांनाच नाहक त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने पुणेकरांवर आल्या पावली परत फिरा अशी वेळ आली. याबाबत वाहतूक निरीक्षकांनी गर्दी लक्षात घेऊन रस्ते बंद केल्याचे सांगितले.
प्रत्यक्षात दुचाकींसाठी पुरेशी जागा असतानाही रस्ते बंद केले होते. दरम्यान गाडगीळ पुतळा येथे शिवेंद्रराजे भोसले खासगी गाडीतून दाखल झाले. त्यांना पोलिसांनी बॅरिकेटसपाशी थांबवले. त्यांनी ओळख दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नाही. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांनी बोलून त्यांना जाण्याची विनंती केली. मात्र शिवेंद्रराजे माघारी निघून गेले.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळांच्या मांडवांवर न्यायालयाच्या निर्बंधाव्यतिरीक्त कोणतेही कोणतेही अतिरीक्त निर्बंध नसल्याचे स्पष्ट केले होते. याचा फायदा घेत अनेक मंडळांनी दोन ते तीन फूट जास्त रुंदीचे मांडव टाकले. काहींनी थेट रस्त्याची एक लेनच काबीज केली. त्यामुळे वाहतुकीला दुहेरी अडथळा निर्माण होत असून,पोलिसांनीच कोंडी वाढवल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाहतूक कोंडी सोडविण्यास मदतीला घेतले जाणार असे सांगितले होते. कार्यकर्ते रस्त्यावर वाहतूक नियोजनात सहभागी होताना कोठेही दिसत नव्हते.
उत्सवाच्या नावाखाली वाहतूक पोलिसांनी नागरिकांवर अन्याय करण्याची ही नवी परंपरा पुणेकरांना असह्य होत चालली आहे. वाहनचालकांना मार्ग काढून देण्याऐवजी थेट बॅरिकेडस् लावून रस्ते बंद करणे वाहतूक पोलिसांना सोपे ठरले आहे. रस्ते बंद करताना वाहन चालकांचा त्रास दिसत नाही.





