पुणे | मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड येथे आंदोलन सुरू केले होते.
त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यातच दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.
विद्यार्थी शास्त्री रस्त्यावर आंदोलन करण्यास बसले होते. त्यांनी एका बाजूने शास्त्री रस्ता आडवून ठेवल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, मुख्य शास्त्री रस्ता एका बाजूने अडवल्याने आजूबाजूचे गल्ली बोळ जाम झाले होते. ऐन कार्यालयीन वेळेत रस्ता अडवल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
यातच गल्ली- बोळांमध्ये गणेशोत्सवासाठी मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. मांडवासाठी ट्रक, टेम्पो भरून बांबू व इतर साहित्य आणून काम सुरू आहे. त्यामुळेही नागरिकांना रस्ता मिळत नव्हता.
याचा परिणाम सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता आणि टिळक रस्त्यांवर झाला होता. वाहतूक पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना मोठी दमछाक होताना दिसत होती. दरम्यान, पोलिसांनी संयम सुटल्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास आंदोलक विद्यार्थ्यांना बळाचा वापर करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेले.





