Pune District : केडगाव- चौफुला चौकात वाहतूक कोंडी
Pune District : विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, नागरिकांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. केडगाव- चौफुला परिसरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी होत आहे.

खुटबाव : दौंड तालुक्यातील केडगाव- चौफुला येथील चौकात दिवसेंदिवस जड वाहनांची वर्दळ वाढत असून, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. बांधकाम साहित्यांची वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
चौकातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जड वाहनांची वाढती संख्या, अरुंद होणारी वाहतुकीची जागा, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, नागरिकांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. केडगाव- चौफुला परिसरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी होत आहे.
वाहतूक पोलीस कार्यालय जवळ, मात्र, प्रश्न गंभीर
परिसरात पोलीस कार्यालय जवळच असतानाही चौकातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक कोंडी होत असताना जड वाहनांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे, वाहनांची शिस्त राखणे, वाहतुकीचा खोळंबा टाळणे यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, चौकात वाहतूक नियंत्रित करणारा कर्मचारी दिसत नसल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.





