महाराष्ट्राशी व्यापार-उदीम अधिक वाढविणार

भावनिक नाते दृढ करण्याचा पोलंडच्या उप परराष्ट्र मंत्र्यांचा मनोदय

कोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर भागात वस्त्रोद्योग, फौंड्री, चर्मोद्योग,पर्यटन अशा विविध क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून पोलंडमधील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासन नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य देईल. कोल्हापूर आणि पोलंडमधील भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी येथे सांगितले.

हॉटेल सयाजी येथे आज सकाळी इंडो पोलंड बिझिनेस मीटमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मर्सिन प्रीझीदॅज, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की यांनी देखील दिल्लीप्रमाणे मुंबई किंवा पुणे ते वॉर्सा अशी थेट हवाई वाहतूक सुरू करण्याचा पोलिश विमान सेवेचा मनोदय व्यक्त केला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने आयोजित या परिषदेत कोल्हापूरमधील उद्योजक देखील सहभागी झाले होते.

दुसऱ्या महायुद्धातील निर्वासित पोलिश नागरिकांना कोल्हापूर येथे जो आश्रय मिळाला आणि येथील समाजात त्यांना जी आपलेपणाची वागणूक मिळाली त्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करून उप परराष्ट्र मंत्री मर्सिन प्रीझीदॅज यांनी सांगितले, येणाऱ्या काळात सांस्कृतिक आदान-प्रदान तसेच व्यापार-उदीम जास्तीत जास्त वाढविण्यासाठी पोलंड सरकार प्रयत्न करणार आहे.
कोल्हापूर-पोलंड व्यवसाय वृद्धीसाठी फोरम

कोल्हापूर आणि पोलंड मधील व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी फोरम स्थापन करण्यात येईल, असे यावेळी खासदार श्री. छत्रपती यांनी सांगितले. पोलंडमधील व्यावसायिक संधींच्या अनुषंगाने येथून लवकरच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ पोलंडला पाठविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

युरोपिअन समुदायात पोलंड हा भारतात मोठी गुंतवणूक करणारा एक देश आहे, असे सांगून पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की म्हणाले, पोलंड आणि भारताचा जीडीपी सारखाच असून याठिकाणी गुंतवणूक केल्यास समाधान मिळेल.

पोलिश उद्योगांचे स्वागतच

पोलिश उद्योगांची महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा असून चाकण येथे दोन वर्षांपूर्वी कमीत कमी दिवसांत सर्व आवश्यक त्या मान्यता देऊन थोनी एल्यूटेक हा धातूंवरील प्रक्रिया उद्योग सुरू झाला, असे सांगून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, दिल्लीप्रमाणे मुंबई किंवा पुणे ते वॉर्सा अशी थेट हवाई वाहतूक सुरू करण्याचा पोलिश विमानसेवेचा मनोदय आहे, अशी सेवा सुरू झाल्यास महाराष्ट्र आणि पोलंड मधील औद्योगिक, सांस्कृतिक आदान प्रदान वाढेल, ही सेवा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी राज्य शासन देखील आग्रही राहील.

अन्न प्रक्रिया, चर्मोद्योग, वस्त्रोद्योग पर्यटन तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा पोलंडचा मनोदय असून उपस्थित उद्योजकांनी यासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चाही केली

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.