Bus Accident : ओतूर टोलनाक्याजवळ सहलीच्या बसचा अपघात; १४ विद्यार्थी जखमी

Bus Accident :अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर ओतूर हद्दीत खामुंडी (डुंबरवाडी) येथील टोलनाक्याच्या पुढे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सहलीच्या एसटी बसचा अपघात झाला. यात १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाले येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. खामुंडी गावाच्या हद्दीत (एमएच १४ एलएक्स ६७४७) या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
या अपघातात १४ मुले व पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून एकूण किती विद्यार्थी बसमध्ये होते, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि इतर वाहनचालकांनी मदतकार्य सुरू केले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Bus accident
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. या घटनेमुळे सहलीच्या आनंदावर विरजण पडले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Bus accident
हेही वाचा:






