T20 World Cup 2024 (Super 8) : बांगलादेशने भारताविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार शांतोने घेतला ‘हा’ निर्णय….

T20 World Cup 2024 (Super 8, IND vs BAN, Toss Update) : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 फेरीत भारताने विजयाने सुरुवात केली. बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. आता ग्रुप-1 मधील भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी आज (22 जून, रात्री 8.00 वा.) होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा बांगलादेश संघाच्या बाजूनं लागला आहे.बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भारताविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
दोन्ही देशांमधील वैर सर्वश्रुत आहे. मात्र, टी-20 मध्ये कायम भारताचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी भारताने 12 सामने जिंकले आहेत. पण, बांगलादेशमध्ये उलटफेर करण्याची ताकद आहे आणि रोहित शर्माच्या टीम इंडियाला हे माहीत असल्यानं त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
या स्पर्धेत भारताचा आतापर्यंत पराभव झालेला नाही. बांगलादेशविरूध्दचा विजय भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकते. त्याचवेळी दुसरीकडे सुपर-8 फेरीत बांगलादेशची मात्र पराभवाने सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस (DLS) नियमांनुसार त्यांचा 28 धावांनी पराभव केला. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना ‘करो या मरो’ सारखा आहे. बांगलादेशने हा सामना गमावल्यास विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील स्पर्धा चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
पिच रिपोर्ट (खेळपट्टी) बदल बोलायचे झाले तर अँटिग्वामधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत करते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत नक्कीच मिळते, पण एकदा फलंदाज स्थिरावले की ते चांगल्या धावा करू शकतात. खेळपट्टीवर फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळपट्टीवर चांगली उसळी दिसू शकते. अँटिग्वामध्ये एकूण 35 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 17 वेळा विजय मिळवला आहे.





