सरकार पाडणे हा भाजपचा सत्ता जिहाद; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ होते. खरं तर हे पाठबळ महाराष्ट्र लुटण्यासाठी होते. यानंतर माझ्या आमदारांवर आणि लोकांवर छापे टाकण्यात आले. हे सर्व गुजरातमधून पुरवलेल्या निधीतून करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार पाडणे हा भाजपचा सत्ता जिहाद होता, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
विधासभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असा नारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व उद्योग मुंबईतून अहमदाबादला नेले जात आहेत. मुंबईतून रोजगार नेले जात आहे. यातून महाराष्ट्र, मुंबईचा आत्मविश्वास तोडला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानी यांनी मोठी भूमिका बजावली. देशाचे आर्थिक केंद्र गुजरातमधील अहमदाबाद करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घातला आहे. पण पण मी तसं होऊ देणार नाही.
उद्धव ठाकरे यांना आमदारांना सांभळता येत नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली, अशी टीका होते. पण आम्ही त्यांना गद्दार आमदार म्हणतो, बंडखोर नाही. कारण ते काही बाळ नव्हते. सत्तेचे दूध पिऊन ते टवटवीत झाले आणि मग सत्तेसाठीच त्यांनी गद्दारी केली. यानंतर त्यांनी भाजपसोबत मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला.
महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला. खरं तर भाजप हा संकरीत पक्ष आहे. ते वोट जिहाद, लव्ह जिहादच्या गोष्टी करतात, पण शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलत नाहीत, अशी टीकाही ठाकरेंनी केली.





