Yashasvi Vaibhav Record : यशस्वी-वैभवच्या वादळात गुजरातचा पालापाचोळा; सेहवाग-गंभीरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
Yashasvi Vaibhav Record : राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील या लढतीत राजस्थानच्या फलंदाजांनी यजमान गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली.

Yashasvi Vaibhav Record IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याच्या फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. राजस्थानने २० षटकात ६ गडी गमावून २१० धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभा केला. या डावात राजस्थानच्या सलामीवीर जोडीने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
यशस्वी-वैभव: आयपीएलची सर्वात वेगवान भारतीय जोडी!
यशस्वी जैस्वाल आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७० धावांची स्फोटक भागीदारी केली. यादरम्यान त्यांनी एक मोठा कीर्तिमान प्रस्थापित केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत ५०० धावा पूर्ण करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर (३०९ चेंडू) यांच्या नावावर होता, जो यशस्वी आणि वैभवने अवघ्या २४८ चेंडूत मोडीत काढला. वैभवने ३१ तर यशस्वीने ३६ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले.
69-0 in 6 by our Powerplay Paglus™️ 💗 pic.twitter.com/XTIjwE25JN
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 4, 2026
ध्रुव जुरेलचा ‘रुद्रावतार’ –
सलामीवीरांनी दिलेल्या भक्कम पायावर कळस चढवण्याचे काम ध्रुव जुरेलने केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जुरेलने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी केली. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ७५ धावांची वादळी खेळी केली.
राशिद खानच्या नेतृत्वाखाली गुजरातची कसोटी –
गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार शुबमन गिल या सामन्यात खेळत नसल्याने कप्तानीची धुरा राशिद खानकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी राशिदच्या रणनीतीला सुरुंग लावत २१० धावा ठोकल्या. आता गुजरातचे फलंदाज या विशाल लक्ष्याचा पाठलाग कसा करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





