Supriya Sule : ‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांकडे केली मोठी मागणी
Supriya Sule : शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी या रकमेतून शेतकऱ्यांच्या अडचणी कशा दूर होणार, असा सवाल केला.

Supriya Sule : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला असून, अनेक भागांत दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी काही तालुक्यांचा समावेश केला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा केली. मात्र, ही मदत अपुरी असल्याची भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला काही सवाल केले आहेत.
पाच हजार रुपयांत काय साध्य होणार? सुप्रिया सुळेंचा सवाल
शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी या रकमेतून शेतकऱ्यांच्या अडचणी कशा दूर होणार, असा सवाल केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अधिक ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्र सरकारच्या नमो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. याशिवाय, महाराष्ट्र सरकारकडूनही सहा हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचा उल्लेख सुळे यांनी केला. मात्र, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेची सद्यस्थिती काय आहे, असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
‘पाच हजार आताचे आणि चार हजार थकीत, पैसे तातडीने द्या’
शेतकऱ्यांना सध्या जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत आणि यापूर्वीची थकीत चार हजार रुपयांची रक्कम मिळून एकूण नऊ हजार रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केवळ तात्पुरती मदत न देता त्यांच्या नुकसानीचा विचार करून भरपाई द्यावी, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
‘आनंदाचा शिधा’ योजनेबाबतही सरकारला सवाल
सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेबाबतही प्रश्न उपस्थित केले. या योजनेची सद्यस्थिती काय आहे, असा सवाल करत त्यांनी उत्तर प्रदेशातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेचे उदाहरण दिले. या राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्य दिले असल्याचे सुळेंनी सांगितले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात याकडे आता लक्ष लागले आहे.






