Bachchu Kadu : भाजपात प्रवेश का केला नाही? बच्चू कडू स्पष्टचं बोलले म्हणाले “विचार जुळले तरच…”
Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

Bachchu Kadu : प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अनेकजण वेटिंगवर असताना कडूंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांसाठी हा धक्का देणारा निर्णय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. अशातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसनेनेत प्रवेश का केला याविषयी भूमिका स्पष्ट केली.
तसेच ते भाजपमध्ये का गेले नाहीत याविषयी त्यांनी सांगितले आहे. “भाजपमध्ये आपलं पटलं नसतं, कारण मी त्या ठिकाणी ‘मॅच’ होत नाही,” असे ते म्हणाले.
याउलट, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना “मध्यरात्रीही लोकांसाठी दार उघडणारा माणूस म्हणजे शिंदे. त्यांच्या स्वभावातील दातृत्व आणि जनसामान्यांसाठीची बांधिलकी मला भावली,” असे म्हणत कडूंनी शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिले, त्यामुळे त्यांच्याविषयी आदर वाढला. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामध्येही शिंदेंची महत्त्वाची भूमिका होती.
विचार जुळले तरच राजकारणात एकत्र येणे शक्य होते, असे सांगत कडू म्हणाले की, “शिवसेनेत प्रवेश करताना पद महत्त्वाचे नाही, तर मुद्दे महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंना विनंती करणार ( Bachchu Kadu)
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी संवाद यात्रा’ काढण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Bachchu Kadu : भाजपात प्रवेश का केला नाही? बच्चू कडू स्पष्टचं बोलले म्हणाले “विचार जुळले तरच…”
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना धीर देण्याचा आणि “लढणारी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे” हा संदेश देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या यात्रेत एकनाथ शिंदे यांनीही सहभागी व्हावे, अशी विनंती आपण करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
हेही वाचा : Home Remedies: काळी मिरीचे अद्भुत फायदे; सर्दी-खोखल्यापासून पचनापर्यंत नैसर्गिक उपाय





