Top 15 News: तीन वर्षे जमीन पडीक ठेवली तर सरकारजमा होणार? , देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला आणि ‘माहेरची साडी’ पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? , वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: शेतीच्या नावाखाली जमीन खरेदी करून ती वर्षानुवर्षे पडीक ठेवणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तीन वर्षे जमीन पडीक ठेवली तर सरकारजमा होणार?
चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे संकेत
Top 15 News: शेतीच्या नावाखाली जमीन खरेदी करून ती वर्षानुवर्षे पडीक ठेवणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षे शेती न केल्यास संबंधित जमीन सरकारजमा करण्याची तरतूद लागू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिले. मोठ्या व्यापाऱ्यांकडून शेतीच्या नावाखाली जमिनी खरेदी करून त्यांचा शेतीसाठी वापर होत नसल्याने सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. दरम्यान, गोशाळांना २५ लाखांपर्यंत अनुदान आणि गोहत्या व गोतस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिकाही बावनकुळे यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला!
जळगाव, धुळ्यात पारा ८ अंशांवर
राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे येथे किमान तापमान ८ अंशांच्या आसपास घसरले आहे. निफाडमध्ये ८.२, नाशिकमध्ये १०, तर पुण्यात ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना हुडहुडी भरत आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन
७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे रविवारी मध्यरात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या वडकुते यांनी विधानपरिषदेचे आमदार, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने हिंगोलीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
पुणे भाजपमध्ये निधीवरून जुंपली!
९५ कोटींचे विकासकामांचे प्रस्ताव वगळले
पुणे महापालिकेतील भाजपमध्ये विकासकामांच्या निधीवरून अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. पर्वती मतदारसंघातील भाजप नगरसेवकांनी स्वपक्षातील दोन नगरसेवकांच्या सुमारे ९५ कोटींच्या प्रस्तावांना विरोध केला. कलम ७२ (ब) अंतर्गत नगरसेवकांना निधीची तरतूद करता येत नसल्याची भूमिका घेत मॉडेल सीबीएसई स्कूलसाठीचे ६१.९ कोटी आणि रस्त्यांच्या कामांसाठीचे ३४ कोटींचे प्रस्ताव कार्यपत्रिकेवरून वगळण्यात आले. या प्रकरणावर पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिली.
पुण्यात महापालिकेचा बुलडोझर;
२ लाख चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त Top 15 News:
पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली. पाच झोनमध्ये राबवलेल्या मोहिमेत तब्बल २ लाख ११३ चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. बिबवेवाडी, हडपसर, वानवडी आणि वाघोलीसह विविध भागांतील रस्ते व चौकांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. झोन दोनमध्ये सर्वाधिक ७५ हजार ९१३, तर झोन पाचमध्ये ७५ हजार ७०० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
भाजपला इंदापुरात मोठा धक्का;
मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे माजी जिल्हा कोअर कमिटी सदस्य मयूरसिंह अरुणराव पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. माजी खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे ते पुतणे आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि दूधगंगा संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे इंदापुरात काँग्रेसला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.
RNO -‘राऊत दलाल कधी झाले?’
नितेश राणेंचा पलटवार!
संजय राऊत यांच्या १५० कोटींच्या आरोपावर मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. राऊत यांना पत्रकार समजत होतो, मात्र ते दलाल कधी झाले, असा टोला त्यांनी लगावला. तसेच आमदार-खासदारांचा अपमान करू नये, असा इशाराही दिला. दुसरीकडे, जयंत पाटील यांच्या संपर्कातील काही लोकांनी सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. हे पैसे अद्याप परत मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
RNO –आधी मूलभूत सुविधा द्या, मगच पुनर्विकासाच्या गप्पा मारा;
अवधेश शुक्लांचा सत्ताधाऱ्यांना टोला!
नवी मुंबईतील पुनर्विकासाच्या योजनांवरून शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते अवधेश शुक्ला यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. शहरात पाणी, वीज आणि पार्किंगसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असताना पुनर्विकासामुळे लोकसंख्या वाढवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. बिल्डर आणि भू-माफियांशी नेत्यांचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच डोंगरांवरील अतिक्रमण आणि वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. आधी नागरिकांना मूलभूत सुविधा द्या, अशी मागणी करत हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस पिण्याचे ६ फायदे;
डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी ठरतो फायदेशीर
गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी पोषक मानला जातो. त्यामध्ये बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्व अ, क, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यास, रोगप्रतिकारशक्तीला आधार देण्यास आणि त्वचेचा तजेलदारपणा राखण्यास मदत करतात. तसेच पोटॅशियममुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यास हातभार लागू शकतो. वजन नियंत्रणासाठीही साखर न घातलेला ज्यूस मर्यादित प्रमाणात घेता येतो. मात्र, ज्यूसपेक्षा संपूर्ण गाजर खाणे अधिक फायदेशीर आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ज्यूसचे प्रमाण ठरवताना विशेष काळजी घ्यावी. ताजा ज्यूस लगद्यासह पिणे अधिक चांगला पर्याय ठरतो.
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला;
राजस्थानमध्ये भीषण अपघात Top 15 News:
राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. रविवारी मध्यरात्री शंभूपुरा गावाजवळ हा अपघात घडला. खाटू श्यामजीचे दर्शन घेऊन महाराष्ट्राकडे परतणाऱ्या भाविकांची क्रूझर गाडी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रम्प-व्हान्स यांच्यातील वादाच्या चर्चांना पूर्णविराम;
इराण युद्धावरील विधानाचं ट्रम्प यांनी केलं समर्थन
इराण युद्धावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, ट्रम्प यांनी या वृत्तांचं खंडन करत व्हान्स यांच्या विधानाला योग्य ठरवलं आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मध्यावधी निवडणुकीतील पराभवाला इराण युद्ध कारणीभूत असल्याचं व्हान्स यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, व्हान्स यांच्या विश्लेषणाबाबत त्यांना कोणतीही नाराजी नाही. इराणला अण्वस्त्र मिळू न देण्याचा निर्णय पुन्हा घ्यावा लागला, तरी व्हान्स यांचं उत्तर ‘हो’ असंच असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दोघांमधील तणावाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ऋषभ पंतचा १०२ मीटरचा षटकार!
१२८ धावांची वादळी खेळी; कसोटीत ऐतिहासिक विक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटीत भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात ७२० धावा करत न्यूझीलंडवर ३५२ धावांची आघाडी मिळवली. ऋषभ पंतने १५३ चेंडूंत १२८ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला १०२ मीटरचा षटकार थेट मैदानाबाहेरील रस्त्यावर जाऊन पडला. यासह पंत कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १०८ षटकारांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला. बेन स्टोक्स १३८ षटकारांसह अव्वल आहे. तसेच सर्व SENA देशांत कसोटी शतक झळकावणारा पंत सहावा भारतीय ठरला.
‘माहेरची साडी’ पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार?
अजिंक्य देव यांनी नव्या कलाकारांची नावे सुचवली
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा पुन्हा रंगली आहे. अभिनेता अजिंक्य देव यांनी नव्या कलाकारांची नावे सुचवली आहेत. विकीच्या भूमिकेसाठी सुबोध भावे, तर अलका कुबल यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान योग्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच खाष्ट सासूच्या भूमिकेसाठी उषा नाडकर्णी यांनीच पुन्हा काम करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ!
१६ दिवसांत ८८० कोटींची कमाई; आता ९०० कोटींच्या क्लबवर नजर
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: पार्ट १’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने १६ दिवसांत भारतात ८८०.०५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. आता ९०० कोटींचा टप्पा गाठण्याची चित्रपटाला संधी आहे. हा विक्रम केल्यास भारतीय बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींची नेट कमाई करणारा तो चौथा चित्रपट ठरू शकतो. याआधी ‘बाहुबली २’, ‘पुष्पा २’ आणि ‘धुरंधर २’ यांनी हा टप्पा गाठल्याचा दावा करण्यात आला आहे.
चारच महिन्यांत ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ मालिका बंद;
ऐश्वर्या नारकर घेणार प्रेक्षकांचा निरोप! Top 15 News:
स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झालेली ही मालिका अवघ्या चार महिन्यांत बंद होत आहे. मालिकेचा अंतिम भाग २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसारित होणार आहे. अंतिम भागात लाडबाईंचा खोटेपणा उघड होणार असून, नाईकबाईंना कुटुंबात पुन्हा मान मिळणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मालिकेच्या अचानक समाप्तीमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.





