Operation Tiger : अखेर फोटो आला समोर! ठाकरे गटातील फुटीर खासदारांसोबत दिसणारी ‘ती’ व्यक्ती कोण?
Operation Tiger : समोर आलेल्या फोटोत ठाकरे गटातील काही खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसत आहेत.

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून अधिक चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भातील एक कथित फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे विविध चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटातील फुटीर खासदारांच्या गुप्त बैठकीचा हा फोटो असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, हा फोटो नेमका ऑपरेशन टायगरशी संबंधित आहे की जुनाच आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
समोर आलेल्या फोटोत ठाकरे गटातील काही खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसत आहेत. यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या खासदारांसोबत शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा देखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा फोटो अभिषेक वर्मा यांच्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या वाढदिवस समारंभातील असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या फोटोचा आणि कथित ‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यक्ष संबंध आहे की नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही.
या फुटीर खासदारांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर पाच खासदार कुठे आहेत याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. सुत्रांच्या माहितीनुसार, या सर्व खासदारांना जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
हेही वाचा : TOP 10 News : भाजपचे 3 आमदार फुटले ते कथित फोटोंवर महाजनांचे स्पष्टीकरण; जाणून घ्या आजच्या TOP 10 News…
गेल्या अनेक महिन्यांपासून मोहिमेची आखणी
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्या रणनीतीतून ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मोहिमेची आखणी सुरू होती आणि त्यासाठी अनेक गुप्त बैठका व संपर्क मोहिमा राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अखेर सोमवारी ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.






