Vishakha Raut : ठाकरे गटात खळबळ! विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द; शिंदे गटाला लॅाटरी लागणार?
Vishakha Raut : २० ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.

Vishakha Raut : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अधिसूचना काढून त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. तसेच, पुढील सहा वर्षांसाठी त्यांना महापालिकेची निवडणूक लढवता येणार नाही. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार होती. २० ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची माहिती राज्य सरकारला दिली होती. तसेच, यासंदर्भात राजपत्र काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने काल रात्री अधिसूचना जारी करत विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे जाहीर केले.
विशाखा राऊत या प्रभाग क्रमांक १९१ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. या प्रभागात सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन परिसराचा समावेश होतो. आरक्षित जागेवरून निवडणूक लढवताना त्यांनी शिंदे गटाचे नेते आणि आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता. प्रिया सरवणकर यांना या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
प्रिया सरवणकर यांना संधी मिळणार?
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम १६ नुसार विशाखा राऊत या नगरसेवकपदासाठी अपात्र ठरल्या असून त्यांची जागा रिक्त झाली आहे. नियमानुसार, संबंधित प्रभागात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या उमेदवाराची निवड होऊ शकते. त्यामुळे प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Wai: गणेशोत्सवात ध्वनीवर्धकाला वाईकरांचा विरोध; पोलिसांकडून गणेश मंडळांना शिस्तीच्या सूचना





