Sourav Das: ऑक्सफर्डचं निमंत्रण, पण लंडनला जाण्यास मज्जाव ! CJP नेते सौरव दास यांना विमानतळावर रोखले
Sourav Das: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Sourav Das: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले.
लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विमानतळावरच रोखण्यात आल्याने त्यांचा लंडन दौरा रद्द झाला. या प्रकारावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संताप व्यक्त केला आहे.
सौरव दास यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनकडून त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले होते. या कार्यक्रमात ‘कॉकरोच मूव्हमेंट’ या विषयावर त्यांना आपले विचार मांडायचे होते.
याशिवाय ऑक्सफर्ड, केंब्रिज, एलएसई आणि एडिनबर्ग यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्येही व्याख्यानांसाठी निमंत्रित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ऐनवेळी विमानतळावर रोखण्यात आल्याने त्यांना या कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही.
दिल्ली विमानतळावर नेमकं काय घडलं? Sourav Das:
सौरव दास यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली. पहाटे एक वाजता लंडनला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी ते दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. त्यावेळी इमिग्रेशन तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. तपासणी करताना आपला पासपोर्ट फ्लॅग करण्यात आल्याचे समजले आणि देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.
🚨This coward government did not allow me to board my flight to London where I was invited by prestigious universities like Oxford, Cambridge, LSE, Edinburgh to deliver talks on the cockroach movement. Indian students put their heart and soul to organise the events but this anti-intellectual govt was scared of me going to these prestigious institutions!
@Cockroachisback
— Saurav Das (@SauravDassss) November 23, 2026
या घटनेवर नाराजी व्यक्त करताना सौरव दास म्हणाले की, भारतीय विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. मात्र, सरकारने आपल्याला या कार्यक्रमांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली नाही. एका तरुणाला प्रतिष्ठित शैक्षणिक व्यासपीठावर आपले विचार मांडण्यापासून का रोखले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘इतकी कशाची भीती वाटते?’ सौरव दास यांचा सवाल Sourav Das:
आपल्याला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न सौरव दास यांनी उपस्थित केला. तसेच नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली.
हजारो कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यांशी संबंधित आरोपी देशाबाहेर जाऊ शकतात, मात्र एका तरुणाला विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी जाण्यापासून रोखले जाते, अशा आशयाची टिप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेत असलेल्या कोणालातरी सौरव दास यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मिळालेल्या निमंत्रणाचा हेवा वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सौरव दास यांच्या शैक्षणिक आणि वैचारिक व्यासपीठावरील संधीमुळे सत्ताधारी अस्वस्थ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.




