Sanjay Raut : “शरद पवारांची कृती शिवसेनेला दुखावणारी”; शिंदेंच्या दालनातील बैठकीवर संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया
Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याबद्दल राऊत यांनी नाराजी बोलून दाखवत शरद पवार यांच्यावर शरसंधाण साधलं.

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील भेटीची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं आहे.
“पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेण्याची गरज नव्हती. या कृतीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांची कृती शिवसेनेला दुखावणारी आहे.” असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, त्या गद्दाराच्या दालनात जाऊन बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते.”
बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातच का : राऊतांचा सवाल (Sanjay Raut)
शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारीचे राजकारण सुरू करणाऱ्या व्यक्तीच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे योग्य संदेश देत नाही. विधानभवनात किंवा त्याच्या परिसरात इतरही पर्याय उपलब्ध असताना ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातच का झाली, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काही राजकीय संकेत आणि मर्यादा पाळायला हव्यात, अशी आठवण संजय राऊतांनी करून दिली. “जर आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती, तर आमच्यावर महाविकास आघाडीविरोधात गेल्याचा आरोप झाला असता. त्यामुळे प्रत्येक घटक पक्षाने अशा बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या ‘रेवा डायमंड्स’चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू
शरद पवार यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही. मात्र, पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेण्याची गरज नव्हती. या कृतीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत जाणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची प्रतिक्रिया महत्वाची
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत नेमके कोणते मुद्दे केंद्रस्थानी होते. याचा तपशील समोर आलेला नाही. तरी या भेटीवरून महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. आता काँग्रेस या भेटीवर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






