अखेर निर्णय झाला..! राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शरद पवार अधिकृत उमेदवार; काँग्रेसकडून समर्थन
Sharad Pawar : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Sharad Pawar : राज्यसभेच्या निवडणुकीत सातव्या जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीला अधिकृत समर्थन जाहीर केले असून ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला यांनी पीटीआयशी बोलताना पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती दिली. राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, भाजपने आपल्या दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची अधिकृत उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसेनेचा उमेदवार बुधवारी रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक उमेदवार यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे.
या जागेसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत होते. तसेच शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे आणि विनायक राऊत यांच्या नावांचीही चर्चा रंगली होती. अखेर काँग्रेसने शरद पवार यांनाच पाठिंबा देत राजकीय चित्र स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेरच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची रणनीती स्पष्ट झाली आहे.





