Sandip Deshpande : बॉक्स उघताच पैशांचे बंडल; 50 लाख कोणत्या नेत्याने दिले? शिंदेंच्या शिवसैनिकाच्या व्हिडिओची चौकशी करण्याची देशपांडेंची मागणी
Sandip Deshpande : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस झाल्याचा संदीप देशपांडे यांचा आरोप

Sandip Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात अॅमझाॅन पार्सलच्या बॉक्समध्ये पैशांचा ढीग असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत संतोष पवार नावाचा युवक शिवसेनेचा शाखाप्रमुख असल्याचं सांगत आहे.
या युवकाने पार्सल बॉक्स उघडल्यानंतर त्यात पैसे असल्याचं दिसून येत आहे. हे पैसे कोणी दिले? या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे, तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा भरपूर पाऊस झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्हिडिओत नेमकं काय आहे?
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या य व्हिडिओमध्ये संतोष पवार शिवसेनेचा शाखाप्रमुख असून १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीच्या काळात तो महायुतीसाठी प्रचाराचं काम करत होता. एका वरिष्ठ नेत्याने मला काही गिफ्ट पाठवले. तो बॉक्स अजूनपर्यंत मी उघडला नव्हता. त्या नेत्याने तू तुझ्या हिशोबाने काम कर असा निरोप दिला होता.
मी माझे काम केले आणि त्यांनी माझ्याकडे बॉक्स दिला होता. या बॉक्समध्ये काय आहे हे मी पाहिले नाही. त्यात काय आहे हे मी दाखवतो असं सांगत या युवकाने तो बॉक्स उघडून दाखवला. ज्यात मोठ्या प्रमाणात पैसे आढळले. कमीत कमी ५० लाख रूपये असल्याचा दावा या युवकाने केला.
हा व्हिडिओ खरा असेल तर ह्याची चौकशी झाली पाहिजे कोण नेता आहे ज्यांनी ह्या शाखा प्रमुखाला पैसे दिले ? https://t.co/XhYENd2YcO
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 24, 2026
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आधीच पैसे दिले होते का ?
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर करत सत्ताधारी शिंदेसेनेला धारेवर धरले आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक २२६ मधील शाखाप्रमुखाशी संबंधित असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. त्यावेळी मकरंद नार्वेकर आणि तेजल पवार यांच्यात लढत झाली होती.
मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांचा अर्ज बाद झाल्याचे आणि युतीमुळे उबाठाकडून उमेदवार दिला नव्हता. पण निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आधीच पैसे दिले होते की निवडणुकीनंतर काम करू नये म्हणून पैसे दिले होते, याचा खुलासा संतोष पवार यांनी करावा, असे ते म्हणाले.
तसेच निष्पक्ष निवडणुका पार पडतात का? आर्थिक व्यवहार होतात का? हे पाहण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याने सरकारसोबतच निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा:
Lemon Storage: सहा महिने लिंबू राहतील अगदी ताजे आणि रसरशीत! फक्त करा हा सोपा घरगुती उपाय





