Vijay Wadettiwar : पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; आता विजय वडेट्टीवार म्हणतात “पवार साहेबांसारख्या नेत्यांना…”
Vijay Wadettiwar : 'पवार साहेबांना दुखावण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेतला, तर देशातील लोकशाही वाचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहील,' असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Vijay Wadettiwar : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमनाच्या विधेयकावरुन देशासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. आता विजय वडेट्टीवार यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
‘पवार साहेबांना दुखावण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेतला, तर देशातील लोकशाही वाचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहील,’ असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्या परिसीमन विधेयकासंदर्भातील भूमिकेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्हाला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. पवार साहेबांसारख्या नेत्यांना दुखावण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची भूमिका आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील जनतेची जी भूमिका होती, ती मांडण्याचा प्रयत्न केला.”
दरम्यान, परिसीमनाच्या मुद्द्यावर शरद पवार गटाने घेतलेल्या भूमिकेत बदल व्हावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता, भेटीगाठी झाल्या किंवा होत असतील, तर त्यातून निश्चितच चांगला मार्ग निघेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
परिसीमनाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा कायम ठेवून त्यामध्येच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. मात्र, लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आणून महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. थोडक्यात लोकसभेच्या जागा वाढणार असतील तर त्याला विरोध असेल अशी भूमिका काँग्रेसची आहे.





