Mohan Bhagwat: आरएसएसच्या कार्यक्रमाला लंडनमध्येही विरोध; कार्यक्रमासाठी जागा न देण्याची संघटनांची मागणी
Mohan Bhagwat : अमेरिकेनंतर आता लंडनमध्येही मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती अभियानाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांचे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये दौरे आयोजित करण्यात आले आहेत. (Mohan Bhagwat)
अमेरिकेच्या दौऱ्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडन येथे एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
याआधी अमेरिका दौऱ्यात अनेक संघटनांनी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला होता. मात्र मोठ्या विरोधानंतरही येथे कार्यक्रम पार पडला. अमेरिकेपाठोपाठ आता लंडनमध्ये देखील मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध होऊ लागला आहे.
‘आरएसएसच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाका’ (Mohan Bhagwat)
आरएसएसच्या कार्यक्रमांवर ग्रेटर लंडन अथॉरिटी या शासकीय संस्थेने बहिष्कार टाकावा, अशी मागणी करणारे पत्र विविध संस्थांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना लिहिले आहे. १५ संघटनांनी आणि अनेक व्यक्तींनी लंडनचे महापौर सादिक खान यांना पत्र लिहून, मोहन भागवत यांच्या दौऱ्यादरम्यान आरएसएसच्या कार्यक्रमांसाठी ग्रेटर लंडन अथॉरिटीची कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणी केली आहे.
या पत्रात आरएसएसला “हुकूमशाही, लष्करी गट” आणि “फॅसिस्ट” स्वरूपाचा गट, असे संबोधण्यात आले आहे. लेबर पार्टीचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनीही आरएसएसच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
‘…संघटनेच्या नेत्याला आश्रय देऊ नये’ (Mohan Bhagwat)
उजव्या विचारसरणीच्या हिंसेचा गंभीर इतिहास असलेल्या संघटनेच्या नेत्याला ब्रिटनने आश्रय देऊ नये. आपल्या शहरात अशा प्रकारच्या द्वेषाला स्थान नसावे. हे घडत आहे, हे खरोखरच धक्कादायक आहे, असे ब्रिटिश खासदार जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटले आहे.
लंडनच्या महापौरांना पत्र लिहिणाऱ्या संघटनांमध्ये हिंदूज फॉर ह्युमन राइट्स, यूके-इंडियन मुस्लिम कौन्सिल, इंडिया लेबर सॉलिडॅरिटी आणि साऊथ एशिया सॉलिडॅरिटी ग्रुप यांसारख्या संघटनांचा समावेश आहे.
पत्रात नेमकं काय म्हंटले? (Mohan Bhagwat)
“भागवत यांच्या दौऱ्यामुळे युकेमधील आरएसएस संबंधित संघटनांना चिथावणीखोर भाषणं देण्याचं बळ मिळेल. भारतीय समुदायामध्ये अधिक ध्रुवीकरण होईल आणि देशातील संवेदनशील घटकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होईल”, असे पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी लंडनचे महापौर सादिक खान यांच्या कार्यालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण किंवा निवेदन आलेले नाही.
मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या गटांनी २००२ च्या गुजरात दंगलीतील आरएसएसच्या कथित भूमिकेबाबतच्या तत्कालीन ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या अहवालाचा उल्लेख केला आहे.
त्या पत्रात आरएसएसला भेदभावाला प्रोत्साहन देणारा, धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा आणि ज्यांच्या कृती युकेच्या मूल्यांच्या विरुद्ध आहेत, असा गट म्हणून वर्णन केले. दरम्यान, मोहन भागवत अमेरिका आणि कॅनडाचा दौरा करून यूकेमध्ये दाखल झालेत. ७ सप्टेंबरपर्यंत मोहन भागवत या ठिकाणी असणार आहेत.
हेही वाचा:
Suraj Chavan : आनंद गगनात मावेना! सूरज चव्हाण झाला बाबा; रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर





