October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर
October Heat: शहरासह उपनगरांमध्ये ऑक्टोबर हिटची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

October Heat: शहरासह उपनगरांमध्ये ऑक्टोबर हिटची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. कमाल तापमान आता ३६ अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मंगळवारी (दि. ६) शिवाजीनगर येथे सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दिवसभर पडणाऱ्या कडक उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर घामाघुम होत आहेत. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. शहरासह उपनगरांमध्येही तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे.
वडगावशेरी, चिंचवड, एनडीए आणि हडपसर या परिसरांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. गेल्या २४ तासांपूर्वी तर जिल्ह्याचा पारा ३६ अंशाच्या पार गेला होता.
सोमवारी तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, शहरात सध्या ऋतू बदल पाहायला मिळत असून, दिवसभर उन्हाचा तीव्र चटका आणि उकाडा जाणवत असला, तरी रात्रीच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे,
तर पहाटेच्या वेळी हलकेसे धुके पडू लागले आहे. यामुळे नागरिकांना थंडीची चाहूल लागली असली, तरी वाढती ऑक्टोबर हिट सध्या थंडीचा जोर कमी करत असल्याचे चित्र आहे.





