Sulekha Chavan : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! ‘या’ महिला नगरसेविकेचे पद रद्द
Sulekha Chavan : विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सुलेखा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या होत्या.

Sulekha Chavan : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ५ अ मधील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. आदिवासी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने हे पद आपोआप संपुष्टात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सुलेखा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशानंतर त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आले आहे.
या प्रकरणामुळे शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली असून, पक्षातील आणखी आठ नगरसेवकांच्या पदांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे यांनी नऊ नगरसेवकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात १६ जून २०२६ पासून प्रभाग क्रमांक ५ अ मधील नगरसेविका पद रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद संपुष्टात
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद आपोआप संपुष्टात आले आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार हे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले.
सुलेखा सूर्यवंशी या ठाणे महापालिकेचे दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी आहेत. जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील त्यांची जागा रिक्त घोषित केली आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाच्या नगरसेविकेचे पद रद्द झाले असून, संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.





