Ketan Aggarwal Case : व्हॉट्सॲप चॅटमधून झाला मोठा खुलासा! सियाने चार महिन्यांपूर्वीच गुपचूप उरकलं होतं लग्न?
Ketan Aggarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात मोठा खुलासा समोर आला असून, यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

Ketan Aggarwal Case : पुण्याजवळील लोहगडावर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे या प्रकरणाला आता वेगळं लागलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याचा दावा पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वी घरच्यांपासून लपवून गुपचूप विवाह केला होता. आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची तपासणी करताना या गुप्त विवाहाचे पुरावे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
१८ जून रोजी लोहगडावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. सुरुवातीला हे प्रकरण त्रिकोणी प्रेमसंबंधातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तपासादरम्यान हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.
हेही वाचा : Chetan Dalvi : ‘लोक मला विसरले आहेत, याचं मनापासून दुःख होतं.’; ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवींनी व्यक्त केली खंत
गेल्या सहा ते सात महिन्यांतील डिजिटल डेटा तपासताना सिया आणि चेतन यांनी आधीच गुप्तपणे विवाह केल्याचे समोर आले. घरच्यांच्या विरोधाच्या भीतीने त्यांनी हे लग्न लपवून ठेवले होते. त्यानंतर केतनला मार्गातून हटवण्यासाठी दोघांनी कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिया आणि चेतन या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सियाचा ‘तो’ मेसेज आणि….; तपासात काय समोर आलं?
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न १४ जून रोजी करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी सियाची हिंमत झाली नसल्याने हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर तिने चेतनला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवत, “माझं डेअरिंग होत नाहीये; तूही चल. आपण दोघे मिळून त्याला दरीत ढकलून देऊ,” असे म्हटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अखेर १८ जून रोजी सिया आणि चेतन यांनी मिळून केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासात आणखी नवे खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Satara News : महू व हातगेघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा






