Bhuvneshwar Kumar Comeback : “भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल…”, भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य
Bhuvneshwar Kumar Comeback : कपिल देव म्हणाले की, भुवनेश्वर कुमारने संघातून अनुपस्थित राहिल्यानंतर आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. या ज्येष्ठ खेळाडूला विश्वास आहे की, त्याच्या पुनरागमनामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल.

Kapil Dev Praises Bhuvneshwar Kumar Team India Comeback New Zealand T20I Series : अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे (Bhuvneshwar Kumar) तब्बल चार वर्षांनंतर भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ३६ वर्षीय भुवनेश्वरची निवड झाली असून, भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी त्याच्या या कमबॅकचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. भुवीच्या या ऐतिहासिक पुनरागमनामुळे कठोर परिश्रम आणि फिटनेसच्या जोरावर कोणत्याही वयात पुनरागमन करता येते, असा आदर्श इतर खेळाडूंसमोर निर्माण झाल्याचे कपिल देव यांनी म्हटले आहे.
“जिद्द अन् फिटनेस असेल तर पुनरागमन शक्य!”; कपिल देव यांच्याकडून कौतुक
नोएडा येथील जेपी ग्रीन्स येथे आयोजित ‘कपिल देव इनव्हिटेशनल टूर चॅम्पियनशिप’दरम्यान बोलताना कपिल देव म्हणाले की, “संघातून बाहेर पडल्यानंतरही भुवीने हार मानली नाही. त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आणि सातत्याने दर्जेदार मारा केला. जर मनात जिद्द असेल, तर कोणत्याही खेळात पुन्हा शिखर गाठता येते, हीच प्रेरणा त्याच्या पुनरागमनातून इतर खेळाडूंना मिळेल.”
नोव्हेंबर २०२२ नंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना; देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक!
भुवनेश्वरने भारतासाठी अखेरचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. त्यानंतर संघातून डावलले जाऊनही तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अविरत घाम गाळत राहिला. नुकत्याच झालेल्या यूपी टी-२० लीगमध्ये त्याने अवघ्या ६.११ च्या इकॉनॉमीने ११ डावांत १४ विकेट्स टिपले होते. भारताकडून खेळताना त्याने २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ९० विकेट्स नोंदवले आहेत.
आशियाई सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सचेही कौतुक!
Greater Noida, Uttar Pradesh: Former cricketer Kapil Dev says, “If you will give opportunity and infrastructure, sure, it is much better than before. And in the coming time, I think sports in India is increasing and gold medal or medals are expected” https://t.co/Vo7rh2pTj3
— IANS (@ians_india) October 7, 2026
कपिल देव यांनी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या प्रणवी उर्सचे कौतुक करताना ते म्हणाले की, प्रोत्साहन मिळाले तर भारतीय खेळाडू जागतिक पातळीवर कोणतीही मजल मारू शकतात.
२२ ऑक्टोबरपासून किवींविरुद्ध महासंग्राम!
अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्या हंगामी निवड समितीने निवडलेला हा पहिलाच संघ आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान ५ टी-२० सामने खेळणार आहे. पहिले दोन सामने क्राइस्टचर्च (२२ आणि २४ ऑक्टोबर), तिसरा सामना वेलिंग्टन (२७ ऑक्टोबर), चौथा ऑकलंड (३० ऑक्टोबर) आणि शेवटचा सामना हॅमिल्टन (१ नोव्हेंबर) येथे खेळवला जाईल.





