Justice For Kakra : बॅंक अधिकारी म्हणाले पैसे पाहिजे तर बहिणीला आणा…. थडग्यातून सांगाडा घेऊन आला भाऊ
Justice For Kakra : अवघ्या २० हजार रुपयांसाठी एका गरिबाला आपल्या मृत नातेवाईकाच्या अवशेषांची विटंबना करावी लागणे, हे आधुनिक भारताच्या व्यवस्थेचे मोठे अपयश मानले जात आहे.

Justice For Kakra : ओडिशातील क्योझर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि प्रशासकीय क्रूर चेहरा समोर आणणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या हक्काच्या पैशांसाठी एका हतबल भावाला चक्क आपल्या मृत बहिणीचा सांगाडा थडग्यातून बाहेर काढून खांद्यावरून बँकेत नेण्याची वेळ आली. ‘बहिणीला प्रत्यक्ष समोर आणा, तरच पैसे मिळतील’ या बँकेच्या जाचक अटीमुळे संतापलेल्या आणि उद्विग्न झालेल्या भावाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मालिपासी गावातील ४२ वर्षीय आदिवासी बांधव जीतू मुंडा यांची बहीण काक्रा हिचा काही काळापूर्वी मृत्यू झाला होता. बहिणीच्या बँक खात्यात सुमारे १९,३०० रुपये जमा होते, जे मिळवण्यासाठी जीतू गेल्या अनेक दिवसांपासून बँकेचे उंबरठे झिजवत होते. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी तांत्रिक कारणांचे दाखले देत त्यांची मागणी फेटाळून लावली.
A man in Odisha dug up his deceased sister’s grave and brought her skeleton to the bank Just to prove she had died.
He had been trying to withdraw ₹20,000 from her account, but bank officials kept insisting he bring the account holder in person. Despite repeatedly telling them… pic.twitter.com/hICEqwvPFu
— Woke Eminent (@WokePandemic) April 28, 2026
खातेदाराचा मृत्यू झाला असतानाही, पैसे काढण्यासाठी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा किंवा कायदेशीर वारसदार असल्याचे जाचक पुरावे सादर करा, असा पवित्रा बँक कर्मचाऱ्यांनी घेतल्याचा आरोप जीतू यांनी केला आहे.
अंगाचा थरकाप उडाला –
बँकेच्या वारंवार फेऱ्या मारून आणि विनंत्या करूनही जेव्हा प्रशासनाचे मन पाघळले नाही, तेव्हा जीतू यांचा संयम सुटला. हतबलतेच्या टोकावर असलेल्या या भावाने बहिणीच्या कबरीकडे धाव घेतली. त्याने बहिणीचे अवशेष बाहेर काढले, ते एका कापडात गुंडाळले आणि सुमारे ३ किलोमीटरचे अंतर पायी कापत तो थेट बँक शाखेत पोहोचला.
आपल्या मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन जेव्हा हा भाऊ बँकेच्या दारात उभा ठाकला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला.
माणुसकी दफन झाली –
या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी बँकिंग यंत्रणा आणि भारतीय नोकरशाहीवर टीकेची झोड उठवली आहे. ‘बहिणीची कबर उकरण्यापूर्वीच या देशातील माणुसकी दफन झाली होती’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
अवघ्या २० हजार रुपयांसाठी एका गरिबाला आपल्या मृत नातेवाईकाच्या अवशेषांची विटंबना करावी लागणे, हे आधुनिक भारताच्या व्यवस्थेचे मोठे अपयश मानले जात आहे. या घटनेने केवळ प्रशासकीय संवेदनशून्यतेवरच नाही, तर अंत्यसंस्काराच्या पावित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





