Rishabh Pant : ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
Rishabh Pant : या महत्त्वाच्या मालिकेसाठी १९ जून रोजी भारतीय निवड समितीची बैठक होणार असून, यामध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Rishabh Pant Vice Captaincy in Danger : सध्या भारतात आयपीएल २०२६ चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून रविवारी, १७ मे रोजी आरसीबीने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या आयपीएल फायनलनंतर भारतीय संघ ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात एक कसोटी आणि १४ जूनपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी १९ जून रोजी भारतीय निवड समितीची बैठक होणार असून, यामध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलमधील खराब फॉर्म नडणार; पंतची उपकप्तानी धोक्यात –
ऋषभ पंत सध्या आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. मात्र, या हंगामात तो कर्णधार आणि फलंदाज अशा दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली आहे की, पंत हा कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात मोठा मॅचविनर आहे, त्यामुळे बोर्ड त्याला गमावण्याचा धोका पत्करू शकत नाही. पंतवरील कप्तानीचा अतिरिक्त दबाव कमी करण्यासाठी आणि त्याला केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता यावे, म्हणून त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्याचा विचार केला जात आहे.
जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता –
अफगाणिस्तानविरुद्धच्या या घरच्या मालिकेदरम्यान भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करून बोर्डाने हा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, बुमराहला विश्रांती द्यायची की नाही, याचा अंतिम निर्णय बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या फिटनेस रिपोर्टनंतरच घेतला जाईल. जर त्याच्या शरीरावर अतिरिक्त ताण असेल, तर त्याला आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करता या मालिकेतून नक्कीच आराम दिला जाईल.
१९ जूनच्या बैठकीकडे क्रिकेट जगताचे लक्ष –
निवड समितीच्या १९ जूनला होणाऱ्या बैठकीत केवळ अफगाणिस्तान मालिकेसाठीच संघ निवडला जाणार नाही, तर अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या टीम इंडियातील भविष्याचा रोडमॅप तयार केला जाईल. ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून घेतल्यास ही जबाबदारी कोणाकडे दिली जाणार आणि बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार, याकडे आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे आणि तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.





