Player of the Month : टीम इंडियाचा डंका! ICCच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी ‘या’ दोन खेळाडूंना मिळालं नामांकन; कोण जिंकणार अवॉर्ड?
Player of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मार्च २०२६ साठी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्काराची नामांकने जाहीर केली आहेत.

ICC Player of the Month March 2026 : आयसीसीने मार्च २०२६ साठी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची नामांकने जाहीर केली असून, यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील विजयाचे नायक ठरलेले संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनला या शर्यतीत स्थान मिळाले आहे.
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या दोघांनीही नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारताला विश्वविजेते बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. दोघांनाही नामांकन मिळाली असली, तरी पुरस्कारावर कोण नाव कोरणार? याची उत्सुक्ता लागली आहे.
संजू सॅमसनचा ‘क्लास’ आणि विश्वविक्रमी कामगिरी –
टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांत संधी न मिळालेल्या संजू सॅमसनने सुपर-८ मध्ये एन्ट्री घेताच धमाका केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करून भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. त्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ८९ आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची लाजवाब खेळी केली. ५ सामन्यांत ३२१ धावा करणाऱ्या संजूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले होते.
Two stars of the #T20WorldCup and an impressive young batter are in the running for the ICC Men’s Player of the Month award for March 2026 💪
Read more 👇https://t.co/OIFnI6j6hC pic.twitter.com/LKfn8BEtxq
— ICC (@ICC) April 6, 2026
जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी –
दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात बुमराहने ४ षटकांत केवळ १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीसाठी त्याला अंतिम सामन्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
एस्टरहुइजनची अनपेक्षित एन्ट्री –
या भारतीय जोडीला दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनने तगडे आव्हान दिले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत २०० धावा कुटल्या, ज्यामध्ये ३३ चेंडूत ७५ धावांच्या वादळी खेळीचा समावेश होता. या कामगिरीमुळे तो आयसीसी रँकिंगमध्ये ३९ व्या स्थानावर पोहोचला असून मालिका विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली.





