Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी नांदेड-सावंतवाडी रोड विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या होणार. वेळापत्रक, थांबे आणि 24 डब्यांच्या गाडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने दोन फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे नांदेड, परभणी, लातूरसह मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणात थेट जाता येणार आहे.
गाडी क्रमांक 07659 नांदेड–सावंतवाडी रोड विशेष रेल्वे 12 आणि 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07660 सावंतवाडी रोड–हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे 14 आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता नांदेडला पोहोचेल.
‘या’ स्थानकांवर थांबे
या विशेष गाडीला पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे असतील.
24 डब्यांची गाडी
ही विशेष रेल्वे 24 डब्यांची असेल. यात वातानुकूलित द्वितीय व तृतीय श्रेणी, स्लीपर, सामान्य द्वितीय श्रेणी आणि एसएलआर डबे असतील. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या थेट रेल्वेमुळे गाडी बदलण्याची गैरसोय टाळता येणार आहे. प्रवाशांनी आरक्षण करण्यापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि उपलब्धता तपासावी.





