Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; अर्धा तास चर्चा, मुंबईत काय घडलं?
Eknath Shinde : सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमासाठी रवाना होताना अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचे समोर आले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत दिली आहे.
“केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले,” असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट कार्यक्रमस्थळी पोहोचले.
📍 #मुंबई |
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.#AmitShah #Mumbai #EknathShinde #Maharashtra@AmitShah pic.twitter.com/2vCRLLbn9u
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 13, 2026
दरम्यान, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात एशियाटिक सोसायटीला विशेष महत्त्व आहे. एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून अमित शाह एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत. यावेळी ते संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधणार असून, संस्थेतील दुर्मीळ दस्तावेजांच्या प्रदर्शनाचीही पाहणी करणार आहेत.
अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला अमित शाह प्रमुख पाहुणे
अमित शाह यांच्या या दौऱ्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांची प्रस्तावित पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत ते कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यानंतर सोमवारी १४ सप्टेंबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन १४ आणि १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमावर टीका करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.





