Bhavesh Vani : दीड वर्षांपूर्वी लग्न; पत्नीला जबर मानसिक धक्का, भावेश वाणीचा नियतीने घात केला, नेमकं काय घडलं?
Bhavesh Vani : आता एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, भावेश वाणी असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Bhavesh Vani : पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसानंतर कचार डेपोमध्ये साचलेल्या हजारो टन कचऱ्याचा ढीग भूस्खलनासारखा घसरून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. त्यामुळे इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली.
त्यावेळी अनेक कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी इमारतीतील कँटीनमध्ये उपस्थित होते. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, भावेश वाणी असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. आणखी आठ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
जेवायला बसलोय मेसेज केला अन्… (Bhavesh Vani)
भावेशच्या जाण्याने वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची पत्नी मोहिनी यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. दुर्घटनेपूर्वी भावेश यांनी पत्नीला “जेवायला बसलो आहे” असा मेसेज पाठवला होता. मात्र, काही मिनिटांतच भीषण दुर्घटना घडली आणि त्यांचा मृत्यू झाला. हा शेवटचा मेसेज त्यांच्या कुटुंबासाठी कायमची वेदनादायी आठवण ठरला आहे.
दीड वर्षांपूर्वी झाला होता विवाह (Bhavesh Vani)
मूळ जळगाव जिल्ह्यातील भावेश वाणी दहा वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात पुणे आले. गेल्या सात वर्षांपासून ते ‘अँथनी वेस्ट’ कंपनीत वरिष्ठ कार्यकारी लेखापाल म्हणून कार्यरत होते. कासारवाडी आणि मोशी येथील कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. दीड वर्षांपूर्वीच त्यांचा मोहिनी यांच्याशी विवाह झाला होता. पाच वर्षांपूर्वी बहिणीचे निधन झाल्यानंतर आई-वडिलांचा एकमेव आधार भावेशच होते.
कुटुंबावर मोठा आघात
भावेश यांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी मोहिनी यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांची वारंवार शुद्ध हरपत असून, आई शालिनी वाणी यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाणी कुटुंबावर एकामागोमाग एक संकटे कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
ही दुर्घटना मुसळधार पावसानंतर घडली. मोशी येथील महापालिकेच्या कचरा डेपोमधील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा ढीग भूस्खलनासारखा कोसळला. त्यामुळे संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. दुपारच्या जेवणासाठी कँटीनमध्ये एकत्र आलेले अनेक कामगार या ढिगाऱ्याखाली अडकले.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
सध्या एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांचा शोध घेत आहेत. उर्वरित कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण आहे.





