VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित
VVS Laxman BCCI : बीसीसीआयने लक्ष्मण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवत यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

BCCI Big Decision VVS Laxman To Attend All Selection Meetings : भारताचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. निवड समितीचे सदस्य प्रज्ञान ओझा यांची कार्यवाहक मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी ओझा यांच्या नेतृत्वाखाली टी-२० संघ निवडण्यात आला. मात्र, या निवडीच्या बैठकीला भारताचे दिग्गज माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता बीसीसीआयने लक्ष्मण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवत यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
प्रत्येक बैठकीत हजेरी अनिवार्य; सेंटर ऑफ एक्सलन्स आणि निवडकर्त्यांत ताळमेळ!
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “व्हीव्हीएस लक्ष्मण यापुढे निवड समितीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहतील. बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख असलेल्या लक्ष्मण यांची उपस्थिती निवड समिती आणि अकादमी यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक करण्यासाठी गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.”
खेळाडूंचा फिटनेस अन् पुनरागमन; थेट लक्ष्मण देणार अपडेट्स!
“VVS Laxman will attend all senior selection committee meetings for better communication.”
– BCCI Secretary Devajit Saikia https://t.co/F2Kc8Laa7v
— News Arena India (@NewsArenaIndia) October 6, 2026
देवजीत सैकिया यांच्या मते, खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम संघाच्या संयोजनावर होत आहे. यापूर्वी निवड समिती आणि सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्यात संवादाचा अभाव असल्याने कोणता खेळाडू तंदुरुस्त आहे आणि कोणाला विश्रांतीची गरज आहे, हे स्पष्ट होत नव्हते. इंडिया ‘ए’ संघाच्या निवडीवरूनही वाद उफाळले होते. आता लक्ष्मण बैठकीत थेट खेळाडूंच्या फिटनेसचे रिअल-टाइम रिपोर्ट देतील.
केवळ फिटनेसवर सल्ला; संघ निवडीत लक्ष्मण यांना मतदानाचा अधिकार नाही!
बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की, लक्ष्मण निवड बैठकीत उपस्थित राहून केवळ खेळाडूंची तंदुरुस्ती आणि त्यांच्या पुनरागमनाचा वेग यावर माहिती देतील. प्रत्यक्ष अंतिम संघ निवडण्यात आणि खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात लक्ष्मण यांची कोणतीही भूमिका नसेल. अंतिम संघ निवडीचा पूर्ण अधिकार प्रज्ञान ओझा आणि निवड समितीकडेच राहील.





