Girish Mahajan : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटोप्रकरणी गिरीश महाजनांनी मौन सोडलं
Girish Mahajan : याबाबत लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या फोटोंमध्ये दिसणारी तरुणी कोण आहे आणि तिचा गिरीश महाजन यांच्याशी नेमका काय संबंध आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर या संपूर्ण प्रकरणावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत व्हायरल होत असलेले फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे म्हटले आहे. (Girish Mahajan)
शुक्रवारी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, “हे फोटो नेमके कसे मॉर्फ करण्यात आले, याची मला माहिती नाही. मात्र, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेले सेल्फी आणि इतर फोटो हे पूर्णपणे मॉर्फिंगद्वारे तयार करण्यात आलेले आहेत. याबाबत लवकरच सविस्तर खुलासा करणार आहे.” (Girish Mahajan)
हेही वाचा : Khed Water Scarcity: खेड तालुक्यात पाणीबाणी! १७ गावे अन् १११ वाड्यांना टँकरचा आधार; पाहा भीषण वास्तव
गुन्हा दाखल
दरम्यान, गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले किंवा मॉर्फ केलेले कथित फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Girish Mahajan)
सायबर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 17/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका फेसबुक खात्यावरून गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Girish Mahajan : माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटोप्रकरणी गिरीश महाजनांनी मौन सोडलं
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





