Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांचा तरूणीसोबत आक्षेपार्ह फोटो व्हायरल; सायबर पोलिसांत गुन्हा
Girish Mahajan : राज्याचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित आक्षेपार्ह फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Girish Mahajan : राज्याचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा कथित आक्षेपार्ह फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
प्राथमिक तपासात हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार अथवा मॉर्फ करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्याद्वारे मंत्री महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी छायाचित्रे प्रसारित करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
प्राप्त तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ व ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) आणि ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू –
सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया खात्याचा तसेच छायाचित्रे प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला असून डिजिटल पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे. पोस्टचा मूळ स्रोत, ती तयार करणारी व्यक्ती आणि प्रसाराचे जाळे यांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या छायाचित्रांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून मंत्री महाजन यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
चौकशीतून सत्य समोर येईल –
मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीतून सत्य समोर येईल आणि तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणतीही माहिती पडताळणीशिवाय पुढे पाठवू नये –
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्याचा गैरवापर यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. बनावट छायाचित्रे आणि दिशाभूल करणारा मजकूर तयार करून व्यक्तींची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणतीही माहिती पडताळणीशिवाय पुढे पाठवू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





