Amruta Fadnavis: गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या “सर्वसमावेशक उत्सव…”
Amruta Fadnavis : डीजे वाजवण्यावरुन सुरू असलेल्या वादाबाबतही दिली प्रतिक्रिया

Amruta Fadnavis : नवरात्रीत गरब्यातील प्रवेशावरुन वाद सुरू झाला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांसह मंत्री नितेश राणे यांनी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. गरब्यामध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार घडू नये, याकरिता मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्टकेली आहे.
गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असून, एखादी मुस्लिम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमात येत असेल, तर त्यात गैर काहीही वाटत नसल्याचे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. (Amruta Fadnavis)
चंद्रपूरातील सर्वात मोठ्या महाशिवलिंग मंदिरात आयोजित रूद्राभिषेकासाठी अमृता फडणवीस आल्या होत्या. त्यादरम्यान, माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी दहीहंडी उत्सवातील महिलांच्या सहभागाबाबत केलेल्या वक्तव्यावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
“महिला मानवी मनोरा उभारून दहीहंडीत सहभागी होत असतील, तर ते समानतेचे प्रतीक आहे. मात्र महिलांना अयोग्य पद्धतीने नृत्य करण्यास प्रवृत्त करणे योग्य नाही, जिथे जे योग्य आहे, तेच केले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
लोकांना त्रास व्हायला नको (Amruta Fadnavis)
सध्या डीजे वाजवण्यावरुन वाद सुरू आहे. त्यावरही अमृता फडणवीस यांनी, “सरकार आणि कोर्टाने जे नियम ठरवून दिले आहे त्याप्रमाणे सर्वांनी सणवार साजरी करावे. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या लोकांना त्रास व्हायला नको, धर्माचे पालन घरात जेवढं करू तेवढं चांगलं, बाहेर जे सणवार साजरे करतो ते नियमात राहून केले पाहिजे,” असे सांगितले.
यावेळी त्यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान महिलेने गोंधळ घातल्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाचे ठिकाण ज्या परिसरात होते, तेथे कोणतीही रहिवासी वस्ती नसताना संबंधित महिला तेथे नेमकी कुठून आली, याची माहिती नाही. बीच पार्क परिसरात उभ्या असलेल्या गाड्या अवघ्या १५ मिनिटांत निघून गेल्या. मात्र संबंधित महिला आणि तिची गाडी कुठेही आढळली नाही, त्यामुळे हे माहीत करावं लागेल की हा पब्लिसिटी स्टंट आहे की तिला खरचं त्रास झाला,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा:





