Abhishek Storm 233 : अभिषेक शर्माचा कहर! अवघ्या ९१ चेंडूत २५ षटकारांसह तब्बल २३३ धावांचा पाडला पाऊस
Abhishek Storm 233 : पंजाब इंटर-डिस्ट्रिक्ट सीनियर वनडे टूर्नामेंटमध्ये अभिषेक शर्माने गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवत २३३ धावांची वादळी खेळी साकारली.

Abhishek Sharma 233 Runs 91 Balls 25 Sixes Punjab Inter District Tournament : झिम्बाब्वे दौऱ्यावर धावांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि टीकेचा धनी ठरलेल्या भारताच्या युवा सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) टीकाकारांना बॅटने अत्यंत सडेतोड उत्तर दिले आहे. पंजाब इंटर-डिस्ट्रिक्ट सीनियर वनडे टूर्नामेंटमध्ये अभिषेक शर्माने गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला. अवघ्या ९१ चेंडूंत २३३ धावांची ऐतिहासिक आणि स्फोटक खेळी करत त्याने आपण पुन्हा जुन्या रंगात परतल्याचे संकेत दिले आहेत.
१५ चौकार अन् २५ षटकारांची बरसात!
२ ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या पंजाब स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट सीनियर वनडे लिमिटेड ओव्हर्स टूर्नामेंट २०२६-२७ च्या सामन्यात अमृतसर सीनियर संघाकडून खेळताना अभिषेकने तरनतारनविरुद्ध हा धावांचा पाऊस पाडला. २५ वर्षीय या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या २३३ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि चक्क २५ गगनचुंबी षटकार ठोकले. या वादळी खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २५६.०४ चा होता.
अमृतसर संघाचा ५३३ धावांचा डोंगर!
ABHISHEK SHARMA MAKES A STATEMENT 🔥
– He smashed 233 runs from just 91 balls with 15 fours & 25 sixes against Tarn Taran Men Sr in the One Day District match pic.twitter.com/QV4k83Oo5e
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2026
अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सहकारी फलंदाज अभय चौधरी (८५ चेंडूंत ९३ धावा) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी ३०५ धावांची अवाढव्य भागीदारी रचली. अभिषेक २५ व्या ओव्हरमध्ये बाद झाला, पण तोपर्यंत अमृतसर संघाने ५० ओव्हर्समध्ये ८ बाद ५३३ धावांचा डोंगर उभा केला होता. यात सनरायझर्स हैदराबादच्या सलील अरोराने २९ धावांचे योगदान दिले.
एशियन गेम्सपूर्वी गवसला फॉर्म !
नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात अभिषेकला तिन्ही टी-२० सामन्यांत केवळ १, ८ आणि २ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर आणि आयसीसी रँकिंगमधील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, या द्विशतकी खेळीने त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला आहे. आता क्रीडाप्रेमींचे लक्ष सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स २०२६ (Asian Games 2026) वर असेल, जिथे अभिषेक भारतीय संघाचा मुख्य शिलेदार म्हणून मैदानात उतरेल.





