District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन
District Bank Election : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

District Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी अद्याप काही जागांवरील उमेदवारीचा तिढा कायम आहे. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात जागावाटपाच्या समीकरणांमध्ये नाट्यमय बदल होताना दिसत आहेत.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतच रस्सीखेच! (District Bank Election)
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यात महायुतीचे सरकार असतानाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा शिंदे गट काही जागांवर वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असले दोन जागांवरील तिढा सुटलेला नाही.
आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची एक अशा एकूण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, मुक्ताईनगर आणि चोपडा येथील जागांवरून राजकीय तणाव वाढला आहे. या जागांचा तिढा सोडवण्यासाठी नेत्यांच्या बैठका काल रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांना फोन; राजकीय चर्चांना उधाण (District Bank Election)
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संवादातून नेमकी कोणती राजकीय समीकरणे जुळवली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा (District Bank Election)
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, मुक्ताईनगर आणि चोपडा येथील जागांचा पेच अद्याप कायम असल्याने अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





