Devendra Fadnavis : पुण्यात विषारी दारूने 13 जण दगावले; CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, थेट आदेश देत म्हणाले…
Devendra Fadnavis : या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करत कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Devendra Fadnavis : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे दोन्ही शहरांत भीतीचे वातावर पसरले आहे. विषारी दारू प्राशन केल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करत कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
“या प्रकरणात कोणतीही हयगय करू नका. एकही आरोपी सुटता कामा नये. कठोर कारवाई करा,” असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, असेही फडणवीस म्हणाले. या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली असून, स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात योगेश वानखेडे या सराईत दारू विक्रेत्याला बड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीही त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. याच्यासोबत आठ जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये मोठी साखळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
योगेश वानखेडे याने पुरवठा केलेली विषारी दारू पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत ‘कर्नलसिंह विरखा’ नावाचा व्यक्ती आपल्या दारू गुत्त्यावर विकत होता. पोलिसांनी कारवाई करत योगेश वानखेडे, कर्नलसिंह विरखा आणि त्याच्या नातेवाईकांसह आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.
विषारी दारू प्राशन करून पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
ही विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने तयार केली होती. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये विकली गेल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : Gold-Silver Rate:सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ ; वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा भाव काय ?






