Maharashtra Politics : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अनेक ठिकाणी भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करत निवडणूक लढवली होती. मात्र अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपला सत्तेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडे महापौरपद आणि शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद अशी सत्ता-समीकरणे आकाराला येत असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने येथे भाजपचा महापौर आणि शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. उपमहापौर निवडीआधीच शिंदे गटात फूट मात्र उपमहापौर पदाच्या निवडीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात बंडखोरी उफाळून आली आहे. पक्ष आदेश डावलून त्रिंबक तुपे, अनिता घोडले आणि हर्षदा शिरसाट हे तिघे उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जिल्हा परिषद मतदानानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. राजेंद्र जंजाळ यांचाही स्वतंत्र दावा छत्रपती संभाजीनगर महापालिका दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्र जंजाळ यांनी देखील उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची फळी फुटली सध्याच्या स्थितीनुसार, संजय शिरसाट यांच्या बाजूने त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट, छाया वाघचौरे, श्वेता त्रिवेदी, किशोर नागरे, अभिजित जीवनवाल, प्रेमलता दाभाडे, राजू राजपूत हे आहेत. तर राजेंद्र जंजाळ यांच्या बाजूने ऋषीकेश जैस्वाल, यशोदा शेळके अशी स्पष्ट गटबाजी निर्माण झाली आहे. 10 तारखेला सत्तासंघर्ष निर्णायक 10 तारखेला होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीत नेमकी कोणाची सरशी होते, आणि शिवसेना शिंदे गटातील ही बंडखोरी कुठपर्यंत जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.