Tigers died in 2025: भारतासाठी व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने २०२५ हे वर्ष काहीसे चिंताजनक ठरले आहे. नॅशनल टायगर कंजर्वेशन अथॉरिटीने (NTCA) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशात एकूण १६६ वाघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली असून २०२४ मध्ये देशात १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली होती. राज्यानुसार आकडेवारीचा विचार केल्यास, मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात ३८, केरळमध्ये १३ आणि आसाममध्ये १२ वाघांचा मृत्यू झाला आहे. या १६६ मृत वाघांमध्ये ३१ बछड्यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, वाघांमधील वाढती संख्या आणि जंगलांमधील मर्यादित जागा यामुळे निर्माण झालेला प्रादेशिक संघर्ष हे या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरत आहे. वन्यजीव संशोधक जयराम शुक्ला यांनी सांगितले की, देशातील वाघांची संख्या आता ‘सॅचुरेशन पॉईंट’वर पोहोचली आहे. वाघांना स्वतःचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यांच्यात आपापसात झुंज लागते आणि त्यातूनच वाघांचे बळी जात आहेत. मध्य प्रदेशातील वाघांच्या वाढत्या मृत्यूंबाबत बोलताना राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुभारंजन सेन यांनी स्पष्ट केले की, राज्यामध्ये वाघांची संख्या देशात सर्वाधिक असल्याने मृत्यूचे प्रमाणही तिथे जास्त दिसून येते. २०१४ मध्ये मध्य प्रदेशात ३०८ वाघ होते, जे २०२२ मध्ये वाढून ७८५ झाले आहेत. वन विभाग प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करतो आणि जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक मृत्यू हा शिकारीचाच संशय मानून तपास केला जातो. शिकारी रोखण्यासाठी राज्यात ‘स्टेट टायगर स्ट्राईक फोर्स’ सक्रिय असून यंदा शिकारीच्या १० प्रकरणांमध्ये २१ जणांना अटक करण्यात आली आहे. जगातील एकूण वाघांच्या लोकसंख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतात आढळतात. २०२२ च्या गणनेनुसार देशात ३,६८२ वाघ होते आणि दरवर्षी त्यात सुमारे ६ टक्के वाढ होत आहे. दरम्यान, यंदापासून देशात पुन्हा एकदा व्याघ्र जनगणना सुरू झाली असून, मध्य प्रदेशातील वाघांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, वाढत्या संख्येसोबतच त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन करणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.