HSC Exam 2026: Best Of Luck! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी असणार खास सुविधा
HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळाकडून १० समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत.

HSC Exam 2026: उच्च माध्यमिक (HSC) म्हणजेच बारावीची परीक्षा आजपासून (मंगळवारी १० फेब्रुवारी) सुरू होत आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या सरकारी निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, तसेच परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
‘कॉपीबहाद्दरांचा’ बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली
बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ‘कॉपीबहाद्दरांचा’ बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. ९० टक्क्यांहून अधिक केंद्रांवर सीसीटीव्हीचा पहारा असला, तरी तांत्रिक कारणांमुळे सीसीटीव्हीपासून वंचित राहिलेल्या १७२ केंद्रांवर कर्मचाऱ्यांचीच अदलाबदल करण्यात आली आहे.
त्यामुळे सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रावरही बोर्डाची विशेष नजर असणार आहे. सीसीटीव्ही नसलेल्या काही ठिकाणी गुगल मीट, झूम अशा प्रणालीचा वापर केला जाणार आहे, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले. HSC Exam 2026:
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक नियुक्त
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारात किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळाकडून १० समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, विभागीय मंडळांकडून जिल्हा स्तरावर प्रत्येकी दोन या प्रमाणे समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत, असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले. HSC Exam 2026:
पीएमपीएमएलची खास सुविधा
परीक्षा कालावधीमध्ये बस पासधारक विद्यार्थ्यांचे बस पास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील. या विद्यार्थ्यांना सदर प्रवासासाठी वेगळे तिकीट घ्यावे लागणार नाही, तसेच परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. याशिवाय परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध होण्यासाठी गर्दीच्या बस थांब्यांवर पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचा :






