बरेली : उत्तर प्रदेशातील राजकारणातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. बरेली जिल्ह्यातील फरीदपूर मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. विशेष म्हणजे, गुरुवारीच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बरेली येथील सर्किट हाऊसमध्ये पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला डॉ. श्याम बिहारी लाल देखील उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांच्या छातीत अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून उपस्थित सहकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. त्यांना तातडीने बरेली येथील ‘मेडिसिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्याने डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. डॉ. श्याम बिहारी लाल हे केवळ राजकारणीच नव्हते, तर ते महात्मा ज्योतिबा फुले रुहेलखंड विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते. फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंजूलता, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. आमदार श्याम बिहारी लाल यांच्या निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “बरेलीच्या फरीदपूर क्षेत्राचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचे आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे. माझी संवेदना शोकाकुल परिवारासोबत आहे. प्रभू श्रीरामाने दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान द्यावे आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी. ॐ शांती!”