Maulana Taukeer Raza : मौलाना तौकीर रझासह 8 जणांना अटक; बरेलीतील दंगल पडली महागात

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथील दंगलीनंतर, पोलिस सक्रीय झाले आहेत. या घटनेसंदर्भात मौलाना तौकीर रझा यांच्यासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तौकीर रझा यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी तीन डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. याव्यतिरिक्त, २००० अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरेलीतील पाच वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये अकरा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. चार भागातील सीसीटीव्ही फुटेज देखील स्कॅन केले जात आहेत. इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे प्रमुख तौकीर रझा यांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी कोठडीत ठेवण्यात आले होते. हिंसाचारात सतरा पोलिस कर्मचारी आणि ४० हून अधिक जण जखमी झाले होते. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या फुटेजच्या आधारे, घटनेत सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बरेली हिंसाचाराबद्दल पोलिसांनी म्हटले आहे की, शहरात एकाच वेळी तीन-चार ठिकाणी दंगली उसळल्या. दंगलखोरांनी गोळीबार आणि दगडफेक केली. या संघर्षात दहा पोलिस जखमी झाले. शुक्रवारी, बरेली व्यतिरिक्त मऊ, सहारनपूर आणि लखनऊमध्ये हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस आता अशा व्यक्तींविरुद्ध कठोर भूमिका घेत आहेत.
बरेली हिंसाचाराच्या पोलिस तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. पोलिसांच्या मते, लोकांची गर्दी गोळा करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आला. तथापि, पोलिस सध्या हे गट कोणी तयार केले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.





