वेडसर पतीचे कृत्य : फुगेवाडी येथील दुर्दैवी घटना
पिंपरी – दोन वर्षांचे मूल कडेवर, साडेतीन वर्षांचे मूल शेजारी आणि आठ महिन्यांचे मूल पोटात असलेल्या महिलेचा तिच्याच वेडसर पतीने कुऱ्हाडीने घाव घालत खून केला. ही हृदयद्रावक घटना फुगेवाडी येथे रविवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पूजा गोपाळ घेवंदे (वय 23, फुगेवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गोपाळ बबन घेवंदे (वय 28) असे आरोपी पतीचे नाव आहे. पूजा यांना साडेतीन आणि दोन वर्षांची मुले आहेत. त्या आठ महिन्याच्या गरोदर होत्या. बाळंतपणासाठी त्या महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथे माहेरी गेल्या होत्या. मात्र रविवारपासून पती वेडसरपणे वागत असल्याने त्याला भेटण्यासाठी रविवारी सायंकाळी पूजा या फुगेवाडी येथे आल्या.
एक मूल कडेवर आणि एक बाजूला बसलेले होते. गोपाळचे आई-वडिल आणि पूजा यांची आई घराबाहेर बसल्या होत्या. त्यांना चहा करण्यासाठी पूजा या घरात गेल्या. त्यावेळी गोपाळ यांनी अचानक पूजा यांच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर पतीने कुऱ्हाडीचा दांडा पूजा यांच्या गळ्यावर मारला. आवाज ऐकून नातेवाईक घरात धावत आले. त्यावेळी गोपाळ याने स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोपाळ हा वेडसरपणे वागत होता. गुरुवारी गोपाळ याने अचानक आपल्या आईचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून त्या बचावल्या. गोपाळवर उपचार करण्याच्या मार्गावर त्याचे नातेवाईक होते. मात्र रविवारी अचानक त्याने आपल्या पत्नीचा खून केला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.