Nashik Tapovan News । Sayaji Shinde – प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या तपोवनात आले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून ‘निवडून दिले म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असे नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडे तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसे मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचे, असे कुठे होते का?’ असा सवाल सयाजी शिंदेंनी केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एका मोठा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्याच सरकारला मोठा धक्का दिला आहे. खरंतर शिंदे यांची शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी भूमिका अपेक्षित नाही. कारण हा मुद्दा अंतर्गत चर्चेमध्ये मांडता येऊ शकतो. सध्या नाशिकच्या तपोवनचा मुद्दा पेटला आहे. नाशिकमध्ये २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशभरातून लाखो साधू, संत आणि भाविक कुंभ मेळ्यासाठी नाशिकमध्ये येतील. या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी नाशिकमध्ये विकास काम सुरु झाली आहेत. त्यात तपोवनमध्ये साधूग्राम बांधण्याचे नियोजन आहे. आणि त्यासाठी जवळपास १८०० झाडे तोडली जाणार असे बोलले जात आहे. ही झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांनी आंदोलन सुरु केले आहे. अनेक पर्यटनप्रेमी, नाशिककर तपोवनातील ही १८०० झाडे वाचवण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावर देखील याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून, नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.